औरंगाबाद – भारतीय जनता पक्षातील आजी-माजी नेते पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत आहेत. प्रत्येकालाच लोकसभेचे डोहाळे लागले आहेत. बीडचे दोनवेळा खासदार राहिलेले जयसिंगराव गायकवाड पाटील तीन दिवस दिल्लीत मुक्कामाला होते. शनिवारी ते औरंगाबादकडे निघाले. तीन दिवसांच्या दौऱ्यात जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांची भेट घेतली. औरंगाबाद लोकसभेची जागा जयसिंगरावांना खुनावत असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु झाली आहे.
गाव तिथे सभागृहाने आले होते चर्चेत
जयसिंगराव
गायकवाड यांचा राजकीय प्रवास भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा
राहिला आहे. १९९९ ते २००४ आणि २००४ ते २००९ असे दोनवेळा ते बीडचे खासदार राहिले
आहेत. केंद्र सरकारमध्ये मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी
काम पाहिले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रत्येक गावात सांस्कृतिक सभागृह
दिले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे ते लोकप्रिय खासदार ठरले होते. गायकवाड पाटील
यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जनसंपर्क. बीड मधील धारूर येथे जन्मलेले
जयसिंगराव गायकवाड यांचा जिल्ह्यातील ११०० ग्राम पंचायतींशी थेट संपर्क होता.
प्रत्येक सरपंचाची त्यांना माहिती होती. कोणत्या गावात केव्हा जाणार याचा त्यांचा
कार्यक्रम ठरलेला असे, आणि ठरलेल्या वेळी पोहोचणे हे देखील त्यांचे वैशिष्ट्य.
मात्र २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे बीडमधून खासदार झाले आणि जयसिंगराव गायकवाड
पडदयाआड गेले. मागील चारवर्षांपासून जयसिंगराव गायकवाड यांचे वास्तव्य
औरंगाबादमध्ये आहे.
भाजप नेत्यांच्या
भेटीगाठीने आले चर्चेत
जयसिंगराव
गायकवाड या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीला गेले होते. ४ ते ६ डिसेंबर ते दिल्लीत
मुक्कामाला होते. या दौऱ्यात त्यांनी भाजप नेत्यांचे निवासस्थान आणि कार्यालयास
भेट दिली. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्याम जाजू, व्ही. सतीश
यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात ‘सांजवार्ता
ऑनलाईन’शी बोलताना जयसिंगराव गायकवाड पाटील म्हणाले,
मी ग्रामीण भागीतील कार्यकर्ता आहे. गडकरी आणि भाजपच्या नेत्यांसोबत नेहमीच भेटी
होत असतात. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील माझ्या कामाचा अहवाल या भेटीदरम्यान
ज्येष्ठ नेत्यांना दिला आहे. ही आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आहे, का या
प्रश्नावर त्यांनी त्याबाबतचा निर्णय पक्ष घेईल. मी कार्यकर्ता म्हणून माझे काम
करत आलो आहे आणि यापुढेही करत राहील.
मागीलवर्षी
दानवे, तनवाणींनी घरीजाऊन घेतली होती भेट
जयसिंगराव
गायकवाड हे अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय नाहीत. मात्र मागील वर्षी १ नोव्हेंबर
रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी आमदार
श्रीकांत जोशी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची
त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
यामुळे भाजपमधील अनेकांच्या पोटात गोळा उठला होता. बरोबर एक वर्षानंतर आता गायकवाड
यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याने औरंगाबाद लोकसभेसाठी तेही तयारीला लागले
असल्याची चर्चा सुरु झाली आहे.








